# अनुक्रमणिका
1 माझी मैना गावावर राहिली..... - ---शाहिर अण्णाभाऊ साठे
2 त्याचा शाहिराचा बाणा…
3 पुण्यात एका दुपारी..
4 स्त्री जातीच्या मुक्तीसाठी... --वामनदादा कर्डक
5 युगायुगाची गुलामी चाल - --दिनकर साळवे
6 तू माणुसकीला जाग… - शाहीर विजय जगताप
7 गावचा पुढारी - पु. ल. देशपांडे
8 तुफानातले दिवे... -वामन दादा कर्डक
9 हे असे आहे तरी पण, - सुरेश भट
10 सत्य सर्वांचे आदी घर - - महात्मा जोतिबा फुले
11 चवदार तळ्याच्या काठी - --वसंत बापट
12 सावित्रीच नमन -- वसुधा सरदार
13 बुद्ध, कबीर, भीमराव, फुले - - लक्ष्मण केदारे
14 चमत्काराची परंपरा - -अंनिस लोक रंगमंच (,एस. एस. शिंदे)
15 आभाळाची आम्ही लेकरं - -वसंत बापट
16 आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो -अंनिस लोक रंगमंच
17 केवळ माझा सह्यकडा. ---वसंत बापट
18 सेवादल सेवादल… ---वसंत बापट
19 सृष्टिचे मित्र आम्ही… ----सुनिल सुकथनकर
20 मन शुध्द तुझ…
21 समतेच्या वाटेन… --शंतनु कांबळे
22 जातीचा ह्यो किला…--संभाजी भगत
23 सावु पेटती मशाल… --कबीर कला मंच
24 बदलत आहे जग हे… बदलत आहे जग हे…
25 वदनी कवळ घेता… --साने गुरुजी
26 घुंगराची काठी दादा… --कबीर कला मंच
27 माह्या माय पुढ फिक… --कबीर कला मंच
28 आता उठवू सारे रान… --साने गुरुजी
29 काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता… --इंद्रजित भालेराव
30 धरण… --दया पवार
31 तोड मर्दा तोड ही चाकोरी -संभाजी भगत
32 केस माझे हे. ----वामनदादा कर्डक
33 पाडू चला रे भिंत ही… --वसंत माने
34 नव्या युगाची नवमहिला…
35 सुंदर ते ध्यान..... - पु.ल. देशपांडे
36 पणती जपून ठेवा… - हिमांशू कुलकर्णी
=================== *
1 माझी मैना गावावर राहिली......
माझी मैना गावावर राहिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
ओतीव बांधा | रंग गव्हाळ | कोर चंद्राची | उदात्त गुणांची |
मोठ्या मनाची | सीता ती माझी रामाची |
हसून बोलायची | मंद चालायची | सुगंध केतकी | सतेज कांती |
घडीव पुतली सोन्याची | नव्या नवतीची | काडी दवन्याची |
रेखीव भुवया | कमान जणू इन्द्रधनुची | हिरकणी हि-याची |
काठी आंधळ्याची | तशी ती माझी गरीबाची |
मैना रत्नाची खाण | माझा जिव की प्राण |
नसे सुखाला वाण | तिच्या गुणांची छक्कड़ मी गयिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
अहो या गरिबीने ताटतुट केली आम्हा दोघांची | झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची |
वेळ होती त्या भल्या पहाटेची | बांधाबांध झाली भाकर तुकड्याची | घालवित निघाली मला
माझी मैना चांदनी शुक्राची | गावदरिला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची |
शिकस्त केली मी तिला हसवण्याची | खैरात केली पत्रांची | वचनांची | दागिन्यांन मडवुन काढायची |
बोली केली शिंदेशाही तोड्याची | साज कोल्हापुरी | वज्रटिक | गल्यात माळ पुतल्याची | कानात गोखरे | पायात मासोळ्या |
दंडात इला आणि नाकात नथ सर्जाची | परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची | आणि छातीवर दगड ठेवून पाठ धरिली मी मुंबईची |
मैना खचली मनात | ती हो रुसली डोळ्यात |
नाही हसली गालात | हात उंचावुनी उभी राहिली ||
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
अहो या मुंबईत गर्दी बेकरांची | त्यात भर झाली माझी एकाची | मढ्यावर पडावी मुठभर माती | तशी गत झाली आमची |
ही मुंबई यंत्राची, तंत्राची, जागणा-यांची, मरणारांची, शेंडीची, दाढ़ीची,
हडसनच्या गाडीची, नायलोनच्या आणि जोर्जेटच्या तलम साडीची | बुटांच्या जोडीची |
पुस्तकांच्या थडीची | माडीवर माडी | हिरव्या माडीची | पैदास इथे भलतीच चोरांची |
ऐतखाऊची | शिरजोरांची | हरामखोरांची | भांडवलदाराची |
पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची | पर्वा केली नाही उन्हाची, थंडीची, पावसाची |
पाण्यान भरल खीस माझ | वान माला एका छत्रीची | त्याच दरम्यान उठली चळवळ
संयुक्त महाराष्ट्राची | बेळगांव, निपानी, कारवार, गोव्यासह एकभाषिक राज्याची |
चकाकली संगीन अन्यायाची | फ़ौज उठली बिनिवारची | कामगारांची | शेतकरीयांची |
मध्यमवर्गीयांची |
उठला मराठी देश | आला मैदानी त्वेष | वैरी करण्या नामशेष |
गोळी डमडमची छातीवर सहिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
म्हणे अन्ना भाऊ साठे | घर बुडाली गर्वाची | मी-तू पणाची | जुलमाची | जबरिची |
तस्कराची | निकुंबळीला कत्तल झाली इन्द्रजिताची |
चौदा चौकड्याच राज्य रावनाचे | लंका जळाली त्याची | तीच गत झाली कलियुगामधी
मोरारजी देसायाची आणि स.का. पाटलाची | अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची |
परळच्या प्रलयाची | लालबागच्या लढायची | फौंटनच्या चढ़ाइची |
झाल फौंटनला जंग | तिथे बांधुनी चंग |
आला मर्दानी रंग | धार रक्ताची मर्दानी वाहिली ||
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची | दाखविली रित पाठ भिंतीला लावून लढायची |
परी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची | गावाकडे मैना माझी | भेट नाही तिची |
तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची | बेलगांव, कारवार, डांग,उंबरगावावर
मालकी दुजांची | दोन खंडनीची | कमाल दंडलीची | चिड बेकिची | गरज एकीची |
म्हणून विनवणी आहे या शिवशक्तिला शाहिराची |
आता वळू नका | रणी पळू नका | कुणी चळू नका |
वेणी माळायची अजुन राहिली | माझ्या जिवाची होतिया काहिली ||
---------------- *
2 त्याचा शाहिराचा बाणा…
त्याचा शाहिराचा बाणा, आवाज जणू गर्जना
त्याच्या शाहिरीची आग, जनतेची सांगे तगमग
तो सत्तेसाठी लाव्हा, शिवबाचा गनिमी कावा
राजा बोले पकडा धावा, नाक्या नाक्यावर फिल्डिंग लावा
शाहिर तुरुंगामधी बंद केला, राजा घाबरला
क्रांतिकारी तो ढाण्या वाघ, कपटाने डांबला
ऐक सरकारा, तुझ्या लोकशाहीचा बुरखा फाटे टरटरा
न्याय कर भला, आझादी चोरा, तुरुंग शाहिरा
न्याय तुझा भलताच पाषाणी, लावलीस छुपी आणीबाणी
शाहिर सांगतोया गा-हाण, लिवतोया कष्टाच गाण
इथं कुणी उपाशी रस्त्यावरती मरतया
बेकारांच तांडच्या तांड रस्त्यान फिरतया
धर्माच्या नावान कुणी कुणाला चिरतया
धरणीच लेकरू कर्जापोटी मरतया
शाहिर मांडतो वनवास जनतेच्या जुलमाचा
शाहिर वाचतो पाढा राजाच्या जुलमाचा
ऐक सरकारा, तुझ्या लोकशाहीचा बुरखा फाटे टरटरा
न्याय कर भला, आझादी चोरा, तुरुंग शाहिरा
न्याय तुझा भलताच पाषाणी, लावलीस छुपी आणीबाणी
भूमिगत झाला शाहिर, जनतेन दिला आधार
राजा पुरता घाबरलेला, बक्षिस केल जाहीर
राजाच गुप्तहेर खात, शाहिराला शोधी दिन रात
शाहिरांना वाचवी जनता, राजावर केली मात
शाहिर बदली डावाला, बांधून ठेवतो डफाला
देतो विद्रोहाची हाक, तय्यार होई भिडण्याला
आता शाहिर मैदानी आला, अन राजा घाबरला
ऐक सरकारा, तुझ्या हुकुमशाहीचा अंत कराया खरा
देतो इशारा, सोडून दे शाहिरा, उखडण्या तुरा तुझा बघ
जनता टपलीया, तुला गाडाया उठलिया
लाल रंगान नटलिया
क्रांतीसाठी जंग हि छीडली, राजा घाबरला
शाहिरांसव जनता भिडली, राजा घाबरला
जनतेचा लढाऊ बाणा, बंडाची करी गर्जना
जनता संघर्षाची आग, सत्तेला लागते धग
जनता सत्तेसाठी लाव्हा, शिवबाचा गनिमी कावा
राजा बोले धावा धावा,शाहिर बोले फिल्डिंग लावा
ऐक सरकारा, तुझ्या हुकुमशाहीचा अंत कराया खरा
देतो इशारा, सोडून दे शाहिरा, उखडण्या तुरा तुझा बघ
जनता टपलीया, तुला गाडाया उठलिया
लाल रंगान नटलिया …………
------------------- *
3 पुण्यात एका दुपारी..............
पुण्यात एका दुपारी, हाक आली कानी...
जोहार माय बापाला पाणी वाढा पाणी..
अंतकरण जाणता महात्मा आला धावूनी..
पाजलं गं त्यानं मांगा महाराला पाणी..
परवा नाही केली गाव विरोधात गेला..
मांगा महाराला पाण्याचा हौद खुला केला..
बंड पुकारूनी असं ज्योती सावित्रीनं..
मनुच्या जिव्हारी पहिला वार केला..
जातीवादी सैतानाची तोडुनिया आणीबानी..
पाजलं गं त्यानं मांगा महाराला पाणी..
4 स्त्री जातीच्या मुक्तीसाठी...
स्त्री जातीच्या मुक्तीसाठी, आले महात्मा फुले ग
आले महात्मा फुले, मुलींचे शिक्षण केले खुले ग
ना ज्ञान मिळाले कधी, त्या दुबळ्या जातीमधी
फ़ुलु लागल्या कळ्या कोवळ्या, फुलू लागली फुले ग
ओढ ज्ञानाची वाढली, शाळा पोरांची काढली
तेव्हापासून शिकू लागली, अस्पृश्यांची मुले ग
ज्या महान क्रांतीमुळे, समतेशी नाते जुळे
त्या क्रांतीची थोर पताका, अजुनी गगनी डुले ग
आज वामनची बाईल, गीत क्रांतीचे गाईल
त्या क्रांतीचे स्त्री-मुक्तीचे, दारच केले खुले ग
--------- *
5 युगायुगाची गुलामी चाल
युगायुगाची गुलामी चाल, सांभाळीत चुल नि मुल
दास्याचा तुरुंग फोडीते, स्त्री दास्याच्या तुरुंग फोडीते ll
कायानु बायानु कोण्या मनुन, बंधन घातलं पोथी लिहुन
बायांची अक्कल म्हणे गहाण, पुरुषी धाकात सदा रहाण
स्मृतीची होळी मी करिते, मनु स्मृतीची होळी मी करिते ll
बालपणामंदी बापाचं नाव, लग्न झाल्यावर पती हा देव
म्हातारपणामंदी पोरांना भ्याव, असा जीवनी गुलामी भाव
बदलाया बंड मी करिते, स्त्री दास्याचा तुरुंग फोडीते ll
कामाला जाताना कमी मजुरी, उशीर झाला तर धनी मुजोरी
गरीबाचं सदा शिळी शिदोरी, जाती पातीची खोल खोल दरी
गुलामी बेडया मी तोडीते, स्त्री दास्याचा तुरुंग फोडीते ll
------------ *
6 तू माणुसकीला जाग…
तू माणुसकीला जाग मानवा होऊ नको हैवान
जाती धर्माच्या नावाने नको घेऊ कुणाचे प्राण…
त्या नवजात अर्भकाचा नसे धर्म कोणता पंथ
तूच त्याच्या कपाळी मारसी तो धर्म आणखी जात
कुणी कुण्या धर्मी जन्मावे नसे कोणाच्या हातात
निष्पाप निर्बलांचा तू कशास घेशी प्राण…
कालवरी ज्याचा असशी तू बंधू सखा तो खासा
भूत धर्माचे जागता तू होशी हैवान कसा
विसरुनी मानव धर्म तू पशूच बनसी जाण…
भडकवतील भडकवणारे हा वणवा जाती धर्माचा
तुला विसर कसा रे पडतो आपल्या मानव धर्माचा
बरबटून कशाला घेशी ते हात आपले रक्ताने…
दैवाने मिळाला तुजला हा अमोल मानव जन्म
कर सार्थक या जन्माचे नको होऊ राक्षस गण
ती त्याग हिंस्त्रता पशूता खरा मानव तू बनून…
- शाहीर विजय जगतापजाती धर्माच्या नावाने नको घेऊ कुणाचे प्राण…
त्या नवजात अर्भकाचा नसे धर्म कोणता पंथ
तूच त्याच्या कपाळी मारसी तो धर्म आणखी जात
कुणी कुण्या धर्मी जन्मावे नसे कोणाच्या हातात
निष्पाप निर्बलांचा तू कशास घेशी प्राण…
कालवरी ज्याचा असशी तू बंधू सखा तो खासा
भूत धर्माचे जागता तू होशी हैवान कसा
विसरुनी मानव धर्म तू पशूच बनसी जाण…
भडकवतील भडकवणारे हा वणवा जाती धर्माचा
तुला विसर कसा रे पडतो आपल्या मानव धर्माचा
बरबटून कशाला घेशी ते हात आपले रक्ताने…
दैवाने मिळाला तुजला हा अमोल मानव जन्म
कर सार्थक या जन्माचे नको होऊ राक्षस गण
ती त्याग हिंस्त्रता पशूता खरा मानव तू बनून…
------------- *
7 गावचा पुढारी
गावकरी दादा माझा पोवाडा, ध्यान देऊनशान ऐकावा
गावचा पुढारी, गाव कैवारी कसा असावा नसावा।।
गावा सुधारणार, लोका शिकविणार, शहाणा पुढारी असावा
अडाणी जनता त्याच्यावर जगता, बंगले उभारणार नसावा।।
मनात धरणार, जनात बोलणार तसंच करणार असावा
ओठावर एक अन पोटात एक, दुतोंडी भोंदू नसावा।।
बंधुभावानं, एकजुटीनं मिळणार जुळणार असावा
गरिबाची होळी त्याच्यावर पोळी भाजून गिळणार नसावा।।
डोळ्याला चाळशी, मुलखाचा आळशी वटवट करणार नसावा
उपाशीपोटी जनतेसाठी खटपट करणारा असावा।।
जुलमाला चिडणार, गनिमाला भिडणार, शूर शिलेदार असावा
लाचार कुत्रा, मुलखाचा भित्रा, गोंडा घोळणार नसावा।।
-------------------- *
8 तुफानातले दिवे.....
तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे
तुफान वारा , पाऊस धारा मुळी न आम्हा शिवे
हल्ल्यावरती होते हल्ले अभंग आमुचे बालेकिल्ले
असाच ताठर माथा अमुचा जरा न खाली लवे
हाय बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करितो मारा
ह्या माऱ्याने मावळणारी ज्योत आमुची नव्हे
तथागतांच्या चीरांतनातून मानवतेच्या कणाकणातून
भिमयुगाच्या निरांजनातून तेल मिळाले नवे
काळ्या धरनिवरचे काळे काळाने विणलेले जाळे
करील काळे आपुले आता काळ्या करनिसवे
एक दिलाने पेटवलेले चरीतेसाठी पाठवलेले
काळ्या राणी अखंड तेथे फिरती आमुचे थवे .
--------------- *
9 हे असे आहे तरी पण
हे असे आहे तरी पण, हे असे असणार नाही
दिवस आमुचा येत आहे, तो घरी बसणार नाही
हे खरे की आज त्यांनी, घेरले सारेच ठेके
पण उद्या त्यांच्या चितेवर, एकही रडणार नाही
सांगती जे धर्म जाती, बांधती ते रोज भिंती
पण उद्याचा सूर्य काही, त्यामुळे फसणार नाही
छान झाले दांभिकांची, पंढरी उद्ध्वस्त झाली
यापुढे वाचाळ दिंडी, एकही निघणार नाही
आजचे आमुचे पराभव, पचवितो आम्ही उद्यास्तव
विजय तो कसला उरावर, जखम जो करणार नाही
---------------- *
10 अखंड
सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर
जगामाजी सुख सारे, खास सत्याची ती पोरे
सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार
आहे सत्याचा बा जोर, काढी भंडाचा तो नीर
सत्य आहे ज्याचे मूळ, करी धूर्तांची बा राळ
बाळ सत्याचे पाहुनी, बहुरूपी जळे मनी
खरे सुख नटा नोव्हे, सत्य ईशा वर्जू पाहे
ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ डंभा पेटू नका.
- महात्मा जोतिबा फुलेजगामाजी सुख सारे, खास सत्याची ती पोरे
सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार
आहे सत्याचा बा जोर, काढी भंडाचा तो नीर
सत्य आहे ज्याचे मूळ, करी धूर्तांची बा राळ
बाळ सत्याचे पाहुनी, बहुरूपी जळे मनी
खरे सुख नटा नोव्हे, सत्य ईशा वर्जू पाहे
ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ डंभा पेटू नका.
----------------- *
11 चवदार तळ्याच्या काठी……
चवदार तळ्याच्या काठी रोवून पाय खंबीर
राहिला उभा दलितांचा सेनानी रणगंभीर ll
दुबळ्यांची सेना मागे लक्तरे हाच गणवेष
परि होता संचारलेला अंगात नवा आवेश ll
त्या पराक्रमी भीमाने क्षणमात्र झाकले नेत्र
ओंजळीत घेता पाणी हे घडले तीर्थक्षेत्र ll
कापरे अधर्मा भरले रुढींची शकले झाली
चवदार तळ्याचा काठी जन्माला क्रांती आली ll
ती भीमगर्जना घुमली संघर्षसिद्ध बुद्धाची
ललकारी मानवतेची दुंदुभी नव्या युद्धाची ll
या दलितांनो, छलितांनो व्हा सज्ज तुम्ही नवसमरा
अन्याय मिटवण्यासाठी व्हा तयार बंधूनी कमरा ll
या पुढे न चालायाची अपमानित जीवनसरणी
रे पराक्रमाने तुमच्या छळणारे आणा चरणी ll
जे धुळीत जगती त्यांच्या जीवनास येवो अर्थ
चवदार तळे होवू दे समतेचे मंगल तीर्थ ll
----------------- *
12 सावित्रीच नमन
पहिली माझी ओवी गं, सावित्रीच्या बुद्धीला
स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला ll
अशिक्षित अडाणी तू, पतीपाशी शिकली
मुलींसाठी पहिली शाळा तुम्ही काढली ll
दुसरी माझी ओवी गं, तुझ्या गं धैर्याला
दगड गोटे खावुनी, चालवली तू शाळा
घराबाहेर काढले, गुंडांनी अडविले
धीराने तोंड दिले, सगळ्या गं त्रासाला ll
तिसरी माझी ओवी गं, तुझ्या मोठया मनाला
फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला
अनाथ नि अबलांचे मायबाप होवुनी
यशवंत बाळाला दत्तक घेतला ll
चौथी माझी ओवी गं, तुझ्या थोर ह्रदयाला
माणुसकीचा झरा त्यात, नित्य गं वाहिला
ज्योतिबाची साऊली नाही तू राहिली
सत्यधर्म प्रकाशात तेजानं तळपली ll
दुःखितांच्या सेवेत, देह तू ठेविला
स्मरण तुझे करुनी, वसा मी घेतला
भगिनींना जागविण, संघटीत करील
ज्ञानज्योत लावीन, हेव्ह तुला नमन ll
----------------- *
13 बुद्ध, कबीर, भीमराव, फुले
बुद्ध, कबीर, भीमराव, फुले
या धरतीवर जन्मले
त्यांनी जन जीवन फुलविले
शेजारीण सखे गं बाई…
देवाच्या नावावर,
जे करती छुमंतर
ते भरती आपली घर गं,
देव अंगात आल्यावर,
दारू गांजा हवा भरपूर
गंडे दोरे खर्च नंतर गं ,
देव अंगात वागतो,
जर शब्दाला जागतो
का भक्त भीक मागतो गं,
जर मुलगा तुजला हवा,
तू नवस करशी तवा
मग नवरा कशाला हवा गं,
उपवासा-नवसामुळं,
ही बुद्धी मातीला मिळं
हे कसं तुला ना कळं गं,
त्या भीमरायानं दिला,
एक जीवन मार्ग भला
समताच तारील तुला गं,
शेवटी सांगतो आता,
सोड साऱ्या भाकड कथा
उरल्या जीवनाला किती व्यथा गं,
------------- *
14 चमत्काराची परंपरा
चमत्काराची परंपरा या धरतीवर वाढली
भोंदूबुवाच्या चमत्काराला दुनियाही भाळली
असं घडलंच नव्हतं कधी असं होणार नाही कधी
या दुनियेमंधी जी…
शेषनागानं भार पृथ्वीचा डोईवर वाहिला
ओझं घेऊन सांगा मंडळी उभा कुठं राहिला
पुष्पक विमान रामाला घेऊन अयोध्येत उतरलं
सांगा मंडळी देशामधी या केव्हा आली सायकल
नाथ फेकीत भस्म विभूती क्षणात पाऊस पड
धरतीपिता तो सूर्य नभीचा गेला होता कुणीकड
भक्ताला पावली निर्मलादेवी कुंडली जागी करी
भाग्य उजाळून बेकारांना ती लावील का नोकरी
पाण्याचा दिवा लावीता साई उजेड त्याचा पड
विजेसाठी का उगाच घालता एन्रोनला साकडं
जाईल नजर करिता चोरी शनीच्या शिंगणापुरी
कित्येक चोरीच्या नोंदी सांगते पोलिसांची डायरी
सूक्ष्म देह कुणी धारण करुनी जातोय मंगळावरी
मनोविकाराचा रोगी खरा हा दावा त्याला डॉक्टर
-------------- *
15 आभाळाची आम्ही लेकरं
आभाळाची आम्ही लेकरं, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही
श्रमगंगेच्या तीरावरती, कष्टकर्यांची आमुची वस्ती
नाव वेगळं नाही आम्हा, गाव वेगळा नाही
इनाम आम्हा एकच ठावे, घाम गाळुनी काम करावे
मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही
माणुसकीचे अभंग नाते, घाम गाळुनी काम करावे
पंथ वेगळा नाही आम्हा संथ वेगळा नाही
कोटी कोटी हे बळकट बाहू, समतेचा रथ ओढून नेऊ
आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही
---------------- *
16 आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो….
आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो
वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो ll
काट्यावरुन जाता मागे न पाय घेऊ
हसऱ्या कळ्याफुलांची स्वप्ने विणुन घेऊ
ओसाड माळ आम्ही फुलवीत चाललो
आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो ll
आमुची सुखे निराळी विश्वात बिंबलेली
दुःखात निर्मितीची स्फुर्ती उफाळलेली
आमुचे भविष्य आम्ही घडवित चाललो
आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो ll
आले अपयश घाले पाया नव्या यशाचा
इतिहास साक्ष आहे आमुच्या पराक्रमाचा
प्रासाद सज्जनांचे सजवीत चाललो
आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो ll
बदलार्थ वेचिती जे सर्वस्वही स्वःताचे
ते शिल्पकार सारे येत्या नव्या युगाचे
त्यांची स्मृती मनाशी जागवीत चाललो
आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो ll
---------------- *
17 केवळ माझा सह्यकडा.....................
भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा
तुमच्याअमुच्या गंगायमुना, केवळ माझी भिवरथडी
प्यार मला हे कभिन् कातळ, प्यार मला छाती निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हाला,बोल रांगडा प्यार मला
ख्रिस्त बुध्द विश्वाचे शास्ते, बोल रांगडा प्यार मला
धिक् तुमचे स्वर्गही साती
इथली चुंबिन मी माती
या मातीचे कण लोहाचे, तृणपात्यांना खड्गकळा
कृष्णेच्या पाण्यातुन अजुनी वाहतसे लाव्हा सगळा
कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परि माझाच
जयदेवाचा जय बोला परि माझा नाम्याचा नाच
जनीँ जनार्दन बघणारा तो 'एका' ह्रदयीँ एकवटे
जनाबाईच्या ओवीमध्ये माझी मजला खुण पटे
इंद्रायणीच्या डोहामधली गाथा ओली ती ओली
ती माझी मी तिचाच ऐशी जवळीक कायमची झाली
भक्तीचा मेळा दाटे
चोख्याची पैरण फाटे
निर्गुण मानवतेची पुजा करणारे करु देत भले
माझ्यासाठी भीमाकाठीँ भावभक्तिची पेठ खुले
रामायण तर तुमचेमाझे भारत भारतवर्षाचे
छत्रपतीची वीरकहाणी निधान माझ्या हर्षाचे
रजपूतांची विक्रमगाथा तुमच्यापरि मजला रुचते
ह्रदयाच्या ह्रदयात परंतू बाजी बाजीची सुचते
अभिमन्यूचा अवतारच तो होता माझा जनकोजी
दत्ताजीचे शेवटचे ते शब्द अजुनि ह्रदयामाजीं
बच जायेँ तो और लढें।
पाउल राहिल सदा पुढे
तुम्हास तुमचे रुसवे फुगवे घ्या सगळा नाजुक नखरा
माझ्यासाठी राहिल गाठीँ मरहट्ट्याचा हट्ट खरा
तुमचे माझे ख्याल तराणे, दोघेही ऐकू गझलां
होनाजीची सोनलावणी वेड लावते परि मजला
मृदंग मोठा सुमधुर बोले, मंजुळ वीणा अन् मुरली
थाप डफाची कडकडता परि बाही माझी फुरफुरली
कडाडणारा बोल खडा जो दरीदरीमधुन घुमला
उघडुनि माझा ह्रदयकवाडा तोच पवाडा दुमदुमला
तटातटा तुटती बंद।
भिवईवर चढते धुंद
औट हात देहात अचानक वादळ घुसमटुनी जाते
उचंबळे ह्रदयात पुन्हा ते इतिहासाशी दृढ नाते
कळे मला काळाचे पाउल द्रुत वेगाने पुढति पडे
कळे मला क्षितिजाचे वर्तुळ क्षणोक्षणीं अधिकचि उघडे
दहा दिशांचे तट कोसळले, ध्रुव दोन्ही आले जवळी
मीही माझे बाहू पसरुन अवघ्या विश्वातेँ कवळी
विशाल दारे माझ्या घरची खुशाल ही राहोत खुली
मज गरिबाची कांबळवाकळ सकलांसाठी आंथरली
मात्र भाबड्या ह्रदयात।
तेवत आहे जी ज्योत
ती विझवाया पहाल कोणी मुक्त करुनि झंझावात
कोटि कोटि छात्यांचा येथे कोट उभारु निमिषात
---वसंत बापट
------------------ *
18 सेवादल सेवादल…
सेवादल सेवादल सेवादल ध्यास जया
हर्षाने उल्लेखिल भावी इतिहास तया
देशाचे सैनिक ते दलितांचे सेवक ते
तरुणांचे नायक ते श्रमिकांचे पाईक ते
शोर्याची आस जया सेवेची प्यास जया
मानाने उल्लेखिल भावी इतिहास तया
नम्र जरी सैनिक हे मान सदा उन्नत ही
सर्व समाजातील हे एक परी मिल्लत ही
श्रमण्यातच विश्रांती झिजणे उल्हास जया
उल्हासुनी उल्लेखिल भावी इतिहास तया
'मी'पण जाऊन इथे 'आपण' हा भाव उरे
सैनिक ह्या नावातच व्यक्तिचे नाव विरे
ध्येयांच्या स्वप्नांचा आहे हव्यास जया
आनंदुनी उल्लेखिल भावी इतिहास तया
भाटानो दूर पळा कीर्तीचे स्तोत्र नको
त्यागाने देश फुलो हार तुरे मात्र नको
देशाचे दास परी देश नको दास जया
गर्वाने उल्लेखिल भावी इतिहास तया
कोणाचे दास्य नको परक्यांचे धनिकांचे
सर्वांचे राज्य असो देशातील श्रमिकांचे
तोवरी रुचणार नसे सोन्याचा घास जया
सोन्याने उल्लेखिल भावी इतिहास तया
--------------------- *
19 सृष्टिचे मित्र आम्ही….
सृष्टिचे मित्र आम्ही मित्र अंकुराचे
ओठावर झेलू या थेंब पावसाचे....
अंकुरत्या बिजाला हवा ऊनवारा
मायेची छाया अन् मनाचा उबारा
पाचूचे मखमाली चित्र जीवनाचे
ओठावर झेलू या थेंब पावसाचे....
लवलवत्या पात्याचे नवे गीत गाऊ
विज्ञाना ममतेचे नवे सूर देऊ
युध्द नको शांती हवी शब्द अमृताचे
ओठावर झेलू या थेंब पावसाचे....
------------- *
20 मन शुध्द तुझ….
मन शुध्द तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची
तु चल रं पुढ तुला रं गड्या भिती कशाची
पर्वा रं कुणाची ....
जो वळखित असे ओक्ष म्हणजी मोठी लढाई
अन् घनाच ते फुलावाणी घाव बी खाई
गळ्यात पडल माळ त्याच्या जयाची
तु चल रं पुढ....
झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला
वाट मंदी काटकुट भेटती त्याला
अरं रगात निघल तरी बी हासल
शाब्बास त्याची
तु चल रं पुढ.....
21 समतेच्या वाटेन…
समतेच्या वाटेन खणकावित पैंजण
तु याव, तु याव, तु याव
बंधन तोडत याव....
शेतात रानात जिथं, घामान भिजली धरती
हिरव्या पिकावरती, जिथं राघु हो डोलती
ऐसी या कष्टाची महती, गान कोकीळा बोलती
त्या सरी सरी तुन, घाम अत्तर लेऊन याव
तु याव, तु याव, तु याव....
वाडे जातीपातीचे, ज्यात माणसं कोंडली
ऐसी जबरी विष, पिढी पिढी हो पोळली
हाडामासाची कशी, माणसं ना दिसली
भिंती जातीपातीच्या, तु तोडत फोडत याव
तु याव, तु याव, तु याव....
अन्यायाविरुध्द जिथं मुठी हो वळल्या
इवल्याशा या चिमण्या, जिथं घारीशी हो भिडल्या
त्या युध्दभुमीतुन, रक्तचंदन लेऊन याव
तु याव, तु याव, तु याव....
बंधन तोडत याव....
------------------ *
22 जातीचा ह्यो किला…
कसा गं बाई जातीचा ह्यो किला, धर्माचा ह्यो किला
कोणाच्या रक्तानं बांधला
कोणत्या भक्तानं बांधला.....
आत भिँती या पाषाणी
रंगल्या रक्ताच्या द्वेषांनी
खणाणती युगांचे ते पाश
कणती भिंती मधे श्वास
कडु बाई घासानं बांधला
सत्तेच्या भाटानं बांधला.....
कसे हे योगियांचे शोर्य शांत महाभोगी क्रौर्य
कळप सुर्याचा डांबला उजेड दावणी बांधला
सत्तेच्या भाटानं बांधला.....
भिजले युगांचे घोंगडे
घोरती मुक्तीचे सांगडे
ग्रंथांच्या रेषांनी बांधला
मनून रक्तात रांधला
कोणाच्या मांसानं बांधला
सत्तेच्या भाटानं बांधला.....
घामाचे ऋतु हे शापित
वस्त्यांचे मरण झोकित
सावल्या विटाळ राखीत
वंदीच्या बंधात सांधित
कोणाच्या प्रेतानं बांधला.....
राबतो तेव्हा आम्ही एक
निर्मितो तेव्हा आम्ही एक
जगवितो तेव्हा एक
मग दुहिचा किल्ला का ठेवला
कशाला डोलारा पाळला
कोणत्या भक्तानं बांधला
कोणाच्या रक्तानं बांधला.....
-------------- *
23 सावु पेटती मशाल….
सावु पेटती मशाल, सावु आग ती जलाल
सावु पेटती मशाल, सावु शोषितांची ढाल, सावु मुक्तिचं पाऊल....
साद दिली पाखरांना, सारं रान धुंडाळुन
फडफडले ते पंख, झेपावल नवं गाणं
सावु वाघिण आमची, तिनं फोडली डरकाळली
थरथरल्या काचा कोया, गड ढासळल गं बाई...
दुध ज्ञानाचे पाजले, गर्भ यातना सोसुन
येल मांडवाला जाई, ज्ञान चांदण पिऊन
हरण चालली कळपात, कशी निर्भय तोऱ्यात
स्वाभिमानाची गं उब, आत्मभान पांघरुन...
घुसमट काळजाची, माझ्या आजही पदरी
कधी ढिली कधी जाम, माझ्या येसणीची दोरी
जरी मोकळा गं श्वास, माझ मन जायबंदी
झळकते गं वरुन,अंधारल आतमंदी
मुक्या माऊलीची साद, सावु घुंगाराचा नाद
सावु लावण्याचा साज, सावु झाकलेली लाज...
आता नको कोंडमारा, नको विषारी हा वारा
नको दासीपण आता, नको जुलमाचा पहारा
ज्योत लाविलीस सावु, वणवा मी पेटविण
तु जे शिल्प कोरलेस, ते मी बोलके करीन...
ज्योती क्रांतीबा जणांचा, तशी क्रांतीज्योत सावु
त्यांनी लावियेले रोप, आम्ही नभाला भिडवु
सावु क्रांतीची गं येल, सावु समतेची चाहुल
सावु शोषितांची ढाल, सावु मुक्तीच पाऊल...
------------------ *
24 बदलत आहे जग हे…
बदलत आहे जग हे सारे नवा नगारा जडे गं
बदल जगा संग तुही आता टाक एक पाऊल पुढे गं।।
हाक अभियानाची नवी, तुझ्या वस्तीला जागवी
गेला काल तेजून रवि, येऊ दे जरा टवटवी
निघ बाहेरी या चक्रातुन तोड मनूचे कडे गं
बदल जगा संग तूही आता टाक पाऊल पुढे गं।।
काट्याची मोळी शिरी दिसभर वाहिली जरी
तरी येळच्या येळेवरी न मिळे पोटाला भाकरी
रुखी सुखी खाऊन प्रश्न आजला पुन्हा उद्याचा पडे गं
बदल जगासंग तूही आता टाक एक पाऊल पुढे गं।।
ही वाडी दिसते जुनी वहीवाट त्याहून जुनी
करती वजनी धंदे कुणी तुझ्या वाट्याला केससुणी
विरुध्द याच्या अभियानाचे पाऊल आता पडे गं
बदल जगा संग तूही आता टाक पाऊल पुढे गं।।
ही जातीची सांगड,तिचं मोडू या तंगडं
शिकवून पोर रांगडं फोडू जीवनाला तांबडं
शिकुनच बघ हा भाऊ आपला जात आहे पुढे गं
बदल जगा संग तूही आता टाक एक पाऊल पुढे गं।।
-------------- *
25 वदनी कवळ घेता…
वदनी कवळ घेता,
नाम घ्या मातृभुचे
सहज स्मरण होते,
आपल्या बांधवांचे
कृषीवल कृषीक्रमी,
राबती दिनरात
श्रमिक श्रम करोनी,
वस्तु या निर्मितात
करुन स्मरण त्यांचे,
अन्न सेवा खुशाल
उदरभरण आहे,
चित्त होण्या विशाल
------------------ *
26 घुंगराची काठी दादा…
घुंगराची काठी दादा,सावकाराच्या माथी हाण
रक्ताची रं तुला आण, देऊ नको रं जीवदाण।।
तुह्या शेतावर दादा, गिधाड झेप घेतया
तुह्या पिकामधी दादा, रानडुक्कर राहतया
आरं कर की त्याच्या खांडोळ्या रं, घाव असा वर्मी घाल।।
तुह्या बाळाच्या मुखातला, घास कोण नेतया
कष्टाच्या रं हातामधी, जहर कोण देतया
घे की असा कानोसा रं, वामनाची चाल जाण।।
तुह्या शेताचा सातबारा, सावकाराच्या पंजामंदी
तुह्या फाशीचा जाहीरनामा, सरकाराच्या धोरणामंदी।।
तुह्या मरणाची रं दादा, मस्करी का होतीया
मढ्यावरल्या लोण्याची, तस्करी का होतीया
दे की गावरान ठोका राजा, मोडू दे की त्याची मान।।
माणगावच्या गावकऱ्यांनी, सरकारी गेंडा रोखला
गोफण धोंडा गगोल घेऊन, पोलिस मारा थोपवला
पिंपळगावच्या शेतकऱ्यांनी, मार्ग आता दाखवला
शाहिराची शपथ घेऊन, हात हत्यारी घातला
आरं व्ह की क्रांतीच वादळ दादा, करतो तुला लाल सलाम।।
----------------- *
27 माह्या माय पुढ फिक…
माह्या माय पुढ फिक, समदं देऊळ राऊळ
मायच्या पायाच्या चिऱ्यात, माझ्या अजंठा ऐरुळ
माझी माय, माझी माय...
कशी दारुड्याची धुरा, मायच्या खांद्यावर आली
तिचे डोळे पाणावले, नाही एकदा हसली
माझी माय, माझी माय...
पेटे पोटात या भुक, नाही भेटे रे भाकर
तिचे इवलेशे बाळ, हिंडतया दारोदार
माझी माय, माझी माय...
वासनेच्या पुजाऱ्याची, माय वरती नजर
तिचे उघडे ते अंग, झाकतेया ती पदर
माझी माय, माझी माय...
बाप रोज दारु पिते, माय उपाशी झोपते
माय मोळ्या ती बांधिते, माय काड्या ती फोडीते
माझी माय, माझी माय...
माय भांडीती घासते, माय धुणीती धुविते
माय भाकर बनवते, माय घास भरवते
माझी माय, माझी माय...
माय मनात कुढते, माय पेटत हरवते पोराबाळा शिकवाया, राबराबीण म्हणते
माझी माय, माझी माय...
माय पोटती जाळते, बापु शिक रे म्हणते
मोठा सायबं हो म्हणते, बाबासाहेब हो म्हणते
आण्णाभाऊ हो म्हणते माझी माय, माझी माय...
----------------------- *
28 आता उठवू सारे रान…
आता उठवू सारे रान,आता पेटवू सारे रान,
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण।।
किसान मजुर उठतील
कंबर कसण्या लढतील
एकजुटीची मशाल घेऊन पेटवतील हे रान।।
कोण आम्हा अडविल कोण आम्हा रडविल
अडवणुक करणाऱ्यांची उडवू दाणादाण।।
शेतकऱ्यांची फौज निघे हातात त्यांच्या बेडी पडे
तिरंगी झेंडे घेती गाती स्वातंत्र्याचे गान।।
पडून ना राहू आता खाऊ ना आता लाढा
शेतकरी अन् कामकरी हे मांडणार हो ठाण
आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान।।
---------------------- *
29 काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता…
काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता,
माझ्या गावाकडं चल माझा दोस्ता।।
तिथं उन्हात उन्हात, तळत्यात माणसं
त्यांच्या घामाचा, भाव हाय सस्ता।।
माझ्या बापाचं बापाचं, हिरवं रान
काळ्या माईनं माईनं, पिकवलं सोनं
आता सुगीत घालत्यात गस्ता।।
इथं डब्यात, साखर लागते गोडं
तिथं बापाच्या बापाच्या, अंगाला फोडं
भाव ठरतो त्याला ना पुस्ता।।
जवा दुष्काळ दुष्काळ, घिरट्या घाली
माझ्या बापाच्या गावाला, कुणी ना वाली
गाव असुन झाला तो फिरस्ता।।
-------------- *
30 धरण…
बाई मी धरण, धरण,धरण बांधिते
माझं मरण, मरण, मरण कांडिते गं
झुंजुमुंज गं झालं, पीठ जात्यात आटलं
कणी कोंडा गं,कोंडा गं, कोंडा मी रांधिते
बाई मी धरण...
दिस कासऱ्याला आल्या जीव मागं घोटाळला
तान्हं लेकरू माझं लेकरू पाटी खाली मी डालते
बाई मी धरण...
काय सांगु उन्हाच्या झळा घाव खाली फुटे शिळा
कढ दाटे गं, कढ दाटे, पायी पाला मी बांधिते
बाई मी धरण...
पेरा पेरात साखर, त्यांचं पिकलं शिवार
घोटभर पाण्यासाठी सारं रान धुंडाळीते
बाई मी धरण...
येल मांडवाला चढे, माझ्या घामाचे गं आळे
माझ्या अंगणी पाचोळा गं पडे
बाई मी धरण...
------------------- *
31 तोड मर्दा…
तोड मर्दा तोड ही चाकोरी
तोड बाई तोड ही चाकोरी
तोड तोड तोड तोड, तोड ही चाकोरी
मुक्तीच गीत म्हणा रात हाय अंधारी
गावापासून आपल्या शहरापातूर
बायकोपासून आपल्या पोरापातूर
सर्वांना मातीशी इमान हाय रं
तरी बी चुल का गुमान हाय रं
तोड मर्दा तोड ही चाकोरी....
कुणाची शेतं नी कुणाची भातं
आपण जात्यात तर हे हसत्यात सुपातं
सुपातलं जात्या जाणार हाय रं
इतिहास खोट कधी बोलणार नाय रं
तोड मर्दा तोड ही चाकोरी....
सुर्याचा प्रकाश सर्वा समान
धरणीच्या पोटातलं पाणी समान
फिरणारा वारा सर्वा समान हाय रं
जमीन का सर्वांना समान नाय रं?
तोड मर्दा तोड ही चाकोरी....
दिल्लीच्या वाटला कुपाणं हाय रं
संसद नावाच दुकान आहे रं
स्वातंत्र्य-स्वातंत्र्य कशात हाय रं
रोटी मागंल त्याला बंदुक हाय रं
तोड मर्दा तोड ही चाकोरी....
पिढ्यान् पिढ्याचं वझ पाठणी
आजवर गायल्यात आसवांची गाणी
सुखाचं गाणं गड्या फुलणार हाय रं
रातीत मशाल पेटवायची हाय रं
आजच मशाल पेटवायची हाय रं
आताच मशाल पेटवायची हाय रं
तोड मर्दा तोड ही चाकोरी....
--------------------- *
32 केस माझे हे....
केस माझे हे जेव्हा गळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले...
जात होतो पुढे जात होतो पुढे
ह्यात होतो पुढे त्यात होतो पुढे
पाय त्यांचेच मागे वळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले...
बाग मागे आणि आग होती पुढे
पंख पसरीत गेलो मी ज्योती पुढे
पंख सारेच तेथे जळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले...
एक सेवक होऊन सेवा दिली
लोक उलटून म्हणतात केव्हा दिली
बोल उलटे हे जेव्हां मिळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले...
गोडी होती मधाची मला जोवरी
लाख लटकून होते मोहोळा परी
संपता अर्क सारे पळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले...
काल वामन परी पेरण्या ही कला
येत होते आणि नेत होते मला
जाणे माझे हे तेथे टळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले...
------------------ *
33 पाडू चला रे भिंत ही….
पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी
या मनामनातून बांधूया एक वाट जाणारी
सांधूया तो पूल जोडू प्रीती त्यावरी
या मनामनातून.......
मी कोण, कोण तू आहे
कोणाला हे कळले आहे
चल विसरु हे मतभेद नको होऊ अविचारी
या मनामनातून........
हा हिँदू, मुस्लिम तू रे
भेद कसा हा मानव सारे
जातीसवा धर्मापरी ही मानवता प्यारी
या मनामनातून........
तुफान वादळे भवती
दर्यावरती लाटा येती
मग एकीत रे चालवू ही नाव तरणारी
या मनामनातून........
----------------- *
34 नव्या युगाची नवमहिला…
नव्या युगाची नवमहिला ही आहे रणझुझांर,
महिला आहे रणझुझांर||
तेज मुखावर हिच्या क्रांतीचे
पाणी नयनी निर्भयतेचे
हासून साहिल जननिँदेचे तीव्र विषारी वार ,
महिला आहे रणझुझांर||
स्वतंत्रतेची आस मनाला
ध्येय सिध्दीचा ध्यास जिवाला
तोडून पदीच्या रुढी शृंखला पुढेच ही जाणार,
महिला आहे रणझुझांर||
समान ध्येया मिळती साथी
देऊन हात तयाच्या हाती
धैर्याने पद टाकील पुढती घेईल ना माघार,
महिला आहे रणझुझांर||
समाजरचना बदलायाही
उत्सुक समता ध्वज धरण्याही
समाजवादी झेंड्याखाली एकजुट करणार,
महिला आहे रणझुझांर||
35 सुंदर ते ध्यान.....
सुंदर ते ध्यान जाई शेतावरी , जाई शेतावरी
औत खांद्यावर घेऊनिया, घेऊनिया||
कासे पितांबर त्याची खादीची लंगोटी, त्याची खादीची लंगोटी
करण्या नांगरटी निघत असे, निघत असे||
मकर कुंडले त्याचा घामाच्याच धारा,त्याचा घामाच्याच धारा
थंडीला उबारा घोंगडीचा,घोंगडीचा||
तुळशी हार नाही गळा त्याचा कमरेला विळा,त्याचा कमरेला विळा
माथ्यावर टिळा चिखलाचा, चिखलाचा||
झोपडीत भुकेलेली त्याची राही रखुमाई,त्याची राही रखुमाई
कष्टकरी आई अन्नाविना, अन्नाविना ||
आरत्या म्हणती त्याची भुकेलेली पोरं,त्याची भुकेलेली पोरं
पोटाचे नगारे वाजोनिया, वाजोनिया||
---------------
*
36 पणती जपून ठेवा…
पणती जपून ठेवा…
थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला
पणती जपून ठेवा, अंधार फार झाला
आले चहु दिशांनी, तुफान विस्मृतीचे
नाती जपून ठेवा, अंधार फार झाला
शिशिरातल्या हिमात, जे गोठतील श्वास
ह्रदये जपून ठेवा, अंधार फार झाला
वणव्यात वास्तवाच्या, होईल राख त्यांची
स्वप्ने जपून ठेवा, अंधार फार झाला
काळ्या ढगात वीज, आहे पुन्हा टपून
घरटी जपून ठेवा, अंधार फार झाला
शोधात कस्तुरीच्या, आहेत पारधी हे
हरणे जपून ठेवा, अंधार फार झाला
ते वाटतील परके, आपुलेच श्वास आता
हातात हात ठेवा, अंधार फार झाला
ह्रदयात तेवणाऱ्या जखमातुनीच आता
कंदील एक लावा, अंधार फार झाला…